ध्रु या संस्कृत धातू पासून ‘धर्म’ हा शब्द बनलेला आहे, ज्याचा अर्थ धारण करणे हा आहे. धर्मशास्त्रानुसार मानवी जीवनात 16 संस्कार सुचविले आहेत. याचे वर्णन धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये केलेले आहे. मानवी गर्भधारणा होण्यापासून अंत्येष्टी पर्यंतचे संस्कार धर्मशास्त्राच्या विविध ग्रंथांमध्ये विधिविधानासह वर्णन केलेले आहेत.
वर्षभरातील सणवार, उत्सव, विविध व्रते केव्हा व कशी साजरी करावी याचा सर्व उहापोह धर्मशास्त्रात आलेला आढळतो.
आपले सण तिथीनुसार साजरे केले जातात, तारखेनुसार नाहीत. दसरा, दीपावली, गणपती इत्यादी….
या सणांच्या दिवशी नक्की काय करावे? कोणते दान करावे? कोणत्या प्रकारची पूजा करावी? त्याचे अध्यात्मिक मूल्य काय आहे इत्यादी माहिती धर्मशास्त्रात दिलेली आहे.
उदाहरणार्थ, संकष्टी चतुर्थीला बरेच लोक उपवास करतात. पण हे पुरेसे नाही. आपण गणपती आणि चंद्राला विविध मंत्रांचा जप करून “ अर्घ्य ” दिले पाहिजे, ते मंत्र कोणते याचे वर्णन धर्मशास्त्रात सापडते.
धर्मशास्त्राचे ग्रंथ आपल्या जीवनात पुण्य मिळवण्याच्या आणि पापक्षालन करण्याच्या विविध मार्गांबदल मार्गदर्शन करतात. याचे सगळ्याचे तपशील धर्मशास्त्रात दिले आहेत. निसर्ग व ऋतूनुसार विविध सणांना त्या त्या ऋतूत येणारी पाने, फुले आणि फळे ईश्वराला अर्पण करण्यास सांगितले आहे.
त्याचप्रमाणे माणसाच्या जन्म व मृत्यू नंतर अनुक्रमे सोयर आणि सुतक पाळण्याचा प्रघात आहे. या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी मनुस्मृति, पराशर स्मृती, देवल स्मृती, धर्मसिंधु इत्यादी धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये विस्तृत वर्णन केलेले आहे.