सूर्यसिद्धांतीय गणितावर आधारित पंचांगच का वापरावे?

सूर्यसिद्धांत हा विश्वाच्या उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे. हा सिद्धांत मानव निर्मित नसून तो अपौरुषेय आहे म्हणुनच कमलाकरभट्टाने त्यास पाचवा वेद अशी संज्ञा दिली आहे व ती सार्थच आहे.  

१. सूर्यसिद्धांतानुसार विश्वाच्या उत्पत्ती पासूनचे गणित : सूर्यसिद्धांतीय वर्षमान : ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे ३१ विपळे दृकसिद्धांतीय वर्षमान : ३६५ दिवस १५ घटिका २२ पळे ५७ विपळे 

वरिल दोन वर्षमानांत साडेआठ पळांचे अंतर आहे व या दोन्ही सिद्धांतांनूसार सृष्टि उत्पत्ती पासून ते इ.स.१९४५ च्या चै.शु.१ पर्यंतचे गणित केल्यास सूर्यसिद्धांतानुसार शुक्रवार येतो व तो त्या दिवसाशी जुळतो परंतू दृकसिद्धांतानुसार (पाश्चात्य गणितानुसार) चार लाख पन्नास हजार दिवसांचे अंतर पडते व त्या दिवसाशी वारसुद्धा जुळत नाही, तीच तर्‍हा कलियुगाच्या आरंभ दिवसाबाबत आहे. शास्त्रानुसार कलियुगाची सुरुवात शुक्रवारी झाली आहे ती दृकगणितानुसार मंगळवारी येते. यावरुन हेच सिद्ध होते की दृक्गणित हे कालनिर्णयासाठी पर्यायाने पंचांग निर्मितीसाठी वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे म्हणुनच वेदव्यास, आद्यशंकराचार्य, मध्वाचार्य, विद्यारण्यस्वामी, राघवेंद्रस्वामी, थोर दत्तावतारी प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) तसेच शृंगेरी शंकराचार्यांनीही कालनिर्णयासाठी सूर्यसिद्धांतीय गणितावर आधारित पंचांगाचाच पुरस्कार केला आहे त्याचे काही संदर्भ खालील प्रमाणे – 

अ) भगवान वेदव्यास – सौरोपनिषदेवाद्या कल्पे त्वस्मिन्सनातनी । यामादित्य: स्वयं प्राह मयाय परिपृच्छते ॥ कालज्ञानं तु तत्सिद्धं विशुद्धं नान्यदुच्यते । तद्विरुद्धं तु यत्सर्वमपरिग्राह्यमेव तत् ।। अर्थात : कल्पापासूनचे गणित ज्या सौरोपनिषदात (सूर्यसिद्धांतात) करण्यात येते असा हा सनातन सूर्यसिद्धांत प्रत्यक्ष सूर्यनारायणाने मयास सांगितला, त्यामुळे या सिद्धांतात सांगितलेले कालाचे ज्ञान हेच स्फटिकासारखे शुद्ध असून याच्या विरुद्ध सांगणारे इतर सर्व सिद्धांत त्याज्यच (अपरिग्राह्यमेव) आहेत.

ब) श्रीनिवासतीर्थ विरचित धर्मशास्त्रे – रवींदुमंदसंसिद्ध तत्तत्तिथ्यादिभोगतः। स्यातां तत्कालबीजोत्थौ बाणवृद्धिरसक्षयौ  ॥ अर्थात रवि व चंद्रावर शास्त्रात दिलेला एकच मंदफल संस्कार करुन व सिद्धांतोक्त बीजसंस्कार करुन (आपल्या मनाने नव्हे) जी तिथि काढण्यात येते ती बाणवृद्धिरसक्षयपक्षाचीच येते व हीच धर्मशास्त्रोपयोगी आहे. 

क) तिथिनिर्णयकारिकेत – अत: पैतृककर्मादौ तत्कालचरबीजकैः । बाणवृद्धा रसक्षीणा ग्राह्या नान्या तिथि: क्वचित् ॥ इति बाणवृद्धिरसक्षयरुपतिथिभ्योऽन्यास्तिथयो निषिद्धा: ।। अर्थात पितृकर्मासाठी(श्राद्ध
इ.) सिद्धांतीयबीजसंस्कार केलेली बाणवृद्धिरसक्षय पक्षाची तिथिच ग्राह्य आहे. या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या तिथि निषिद्ध आहेत. 

ड) स्मृतिसमुच्चये – सूर्यसिद्धांतपंचांगं विलोक्यैव प्रवर्तयेत् । प्रमाणं तदिति ज्ञेयं अन्यथा व्याकुलं भवेत् ।। सूर्यसिद्धांतावर  आधारित पंचांगच शास्त्राने प्रमाण मानले असून त्यानुसारच वर्तन करावयास सांगितले आहे अन्यथा मानवास दुःख (व्याकुळता) पदरी पडेल. (गीतेत भगवान श्रीकृष्ण ‘अदेशकालेयद्दानं’ या श्लोकात सांगतात की अयोग्य वेळी केलेल्या कोणत्याही कर्माचे फळ कर्त्यास मिळत नाही म्हणूनच कर्ता कर्म करुनही दुःखास प्राप्त होतो) 

इ) ६०० वर्षांपूर्वी श्रीविद्यारण्यस्वामींनी दृग्गणितप्रभा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात – ‘सूर्यसिद्धांतशास्त्रेण समानिता ग्रहा: सदा । नित्येकर्मण्युपादेया न तु दृग्गणितागता: ।।’ अर्थात सूर्यसिद्धांत शास्त्रानी साधन केलेल्या रविचंद्रादि ग्रहांनुसारच नित्यकर्मे करावीत दृग्गणितानुसार आलेल्या ग्रहांनुसार नव्हे.

उ) भार्गवऋषि म्हणतात – ‘सूर्यांशपुरुषेणोक्ततंत्रं तिथ्यादिसंमतं । ग्रहणादौ तु वक्ष्यामि सविशेषमथोशृणु ॥’ अर्थात सूर्यांश पुरुषाने मयास सांगितलेल्या सूर्यसिद्धांत तंत्राने आलेल्या तिथि इत्यादी पंचांगे शास्रसंमत आहेत व ग्रहण इ.दृष्य घटनांसाठी विशेष गणित(दृग्गणित) वापरावे. 

प) पराशरमाधवीये – सार्द्धबाण सपादांगघटी वृद्धिक्षयान्विताः । गृहिता धर्मशास्त्रेषु तिथयो नित्यकर्मसु । अर्थात  सावयव बाणवृद्धिरसक्षयपक्षानुसार येणाऱ्या तिथिच धर्मशास्त्रातील नित्यकर्मासाठी ग्राह्य धराव्यात.

२. सांप्रत प्रचलित असलेल्या दृकसिद्धांतीय पंचांगांची धर्मशास्त्रदृष्ट्या निरर्थकता :

अ) ज्योतिर्विदाभरण ग्रंथात कालिदास म्हणतो – वृद्धिक्षयौ स्त: परमौ तिथौ सदा व्यर्धा रसा: साङध्रिरसाश्च नाडिकाः ।
सनेमतर्का: सपदर्णवास्तु भे निस्त्र्यंशदोषो द्विरदा युतौ क्रमात् । वरिल श्लोकात तिथि नक्षत्र व योगांच्या क्षयवृद्धिबाबत पुढील नियम सांगितला आहे. तिथिची वृद्धि जास्तीत जास्त ६५ घटीका ३० पळे व क्षय ५३ घटीका ४५ पळापर्यंत होवू शकतो, नक्षत्राची वृद्धि जास्तीत जास्त ६६ घटी ३० पळे व क्षय ५५ घटीका ४५ पळांपर्यंत होवू शकतो व योगाची वृद्धि ६१ घटीक ४० पळे व क्षय ५२ घटीकांपर्यंतच होवू शकतो. सांप्रत दृक् सिद्ध पंचांगात वरिल नियम धाब्यावर बसवून धर्मशास्त्रसंमत नसलेले नियम वापरुन तिथि-नक्षत्र-योगांच्या क्षयवृद्धि दिलेल्या आहेत, ज्यामुळे यजमानास त्याच्या कर्माचे योग्य फळ मिळत नसल्यामुळे त्याचा धर्मशास्त्रावरिल विश्वासच उडत चालला आहे. 

ब) सध्या प्रचलित असलेल्या दृक् सिद्धांतीय पंचांगात देण्यात येणारी दैनिक ग्रहस्थिती, ही पाश्चात्य गणितांवर आधारित असते. पहिली गोष्ट म्हणजे पाश्चात्य गणितावरुन आलेली ग्रहस्थिती ही ‘सायन’ असल्यामुळे हे पंचांगकर्ते या सायनग्रहांमधून चित्रापक्षीय अयनांश वजा करुन ही ग्रहस्थिती ‘निरयन’ करुन पंचांगात देतात, ज्यामुळे यांची पंचांगे सर्वथा चित्रापक्षीय अयनांशावरच अवलंबून आहेत (सूर्यसिद्धांताने गणित करुन येणारी ग्रहस्थिती ही मुळातच निरयन असल्यामुळे कोणत्याही अयनांशांवर अवलंबून नसते.) चित्रापक्षीय अयनांशही कसे चुकलेले आहेत ते आपण पुढे पाहूच! दुसरी गोष्ट या पंचांगात देण्यात येणारी दैनिक ग्रहस्थिती तसेच पंचांगाची तिथि-नक्षत्र-योग-करण ही अंगे काढण्यासाठी स्पष्ट रवि व चंद्रावर च्युतिफलसंस्कार, लंबनसंस्कार, तिथिफलसंस्कार आणि विरुद्धचिन्हरविफलसंस्कार हे चार सिद्धांत व वेदविरुद्ध संस्कार केलेले आढळतात, या चार संस्कारामुळे येणारा चंद्र हा कदंबप्रोत वृत्तावरिल येतो.सूर्य हा नेहमीच क्रांतीवृत्तावर असतो. (वास्तविक ‘एकेन मान्देन तु कर्मणात्र स्फुटौ भवेतां रविशीतभानू ॥’ या सिद्धांतशिरोमणीतील वचनानूसार सूर्य व चंद्र हे एका मंदफलसंस्कारानेच स्पष्ट होतात.) हे पंचांगकर्ते तिथि काढण्यासाठी या कदंबप्रोत वृत्तीय चंद्रातून क्रांतीवृत्तावरिल सूर्य वजा करतात. तर्कशास्त्रातील पुढील नियमानुसार ‘चंद्रसूर्ययो: भिन्नस्थानीयत्वात् न सामानाधिकरण्यमस्ति’ अर्थात चंद्र व सूर्य हे दोन भिन्न वृत्तांवर असताना त्यांची वजाबाकी होवू शकत नाही त्यासाठी चंद्र क्रांतीवृत्तावर परिणत करुन मगच तिथि नक्षत्रे
इत्यादींचे समय काढावे. सूर्यसिद्धांतात क्रांतीवृत्तास आधार मानून नक्षत्रादिचे गणित करण्यात येते.

क) पाश्चात्य गणितानूसार येणारे रवि-चंद्र हे भूकेंद्रिक आहेत व त्यामुळे तिथिनक्षत्रादींचे समय सुद्धा भूकेंद्रिकच असतात आमचे म्हणणे असे की भूकेंद्रिक रवि-चंद्रावरुन काढलेल्या तिथीस ‘दृश्य तिथी कसे म्हणावे किंवा दृश्य तिथी भूकेंद्रिक कशी असू शकेल म्हणजेच ‘दृश्य तिथी’,’दृग्गणित’,’दृक्पंचांग’ हे शब्द जर सार्थ ठरवायचे असतील तर सर्व ग्रह भूकेंद्रिक (Geocentric) न घेता ‘भूपृष्ठीय घ्यावे लागतील, व त्या परिस्थितीत प्रत्येक गांवाचे भूपृष्ठानुसार पंचांग वेगळे बनेल. तात्पर्य सांप्रत सर्व दृश्य पंचागे ही ना दृश्य आहेत ना प्राचीन सिद्धांतावर आधारीत आहेत 

ड) प्राचीन ग्रंथानुसार बुधाची एका दिवसाची स्पष्ट गती ११८ कलांपेक्षा जास्त नसते, १४व्या शतकात मकरंदाने व १५व्या शतकात गणेशदैवज्ञाने प्राचीन गणिताने काढलेली बुधाची गती व प्रत्यक्ष वेधाने आलेली बुधगती यात साम्य आढळले. पण पाश्चात्य गणितात त्याची एका दिवसाची गती १३२ कलांपेक्षा जास्त झालेली आढळते. अनादिकालापासून प्रमाणित
असलेली व प्रत्ययास आलेली बुधाची गती शंभर दीडशे वर्षात एकदम कशी वाढली? याचा विचार सूज्ञांनी अवश्य करावा.

इ) आधुनिक पंचांगात स्पष्टराहु देण्याचे फॅड’ आहे, ज्यास कोणत्याही प्राचीन सिद्धांत ग्रंथांचा आधार नाही. प्रत्यक्षात, राहू हा मध्यम गतीचाच घेण्याची प्राचीन परंपरा आहे. सिद्धांत ग्रंथांनुसार मध्यम राहुची गती ३ कला १० विकला वक्री सांगितली आहे. दृकपंचांगात मात्र यांचा राहु जणुकाही यांच्या आज्ञेने आकाशात कधी वक्री, कधी मार्गी तर कधी स्तंभी सुद्धा होतो ज्याचा विपरीत परिणाम जन्मकुंडलीनुसार राहुचे फलित वर्तविताना होतो, कारण संहिताग्रंथांमध्ये सांगितलेली राहुची फळे ही मध्यमराहुला धरुनच आहेत स्पष्टराहुला धरुन नव्हे, किंबहुना मध्यम राहुवरुन स्पष्ट राहु कसा काढावा याचे कोणतेही गणित सिद्धांत ग्रंथात उपलब्ध नसताना यांनी स्पष्ट राहु काढला कोठून ??…. राहुची गती ही मध्यम व वक्रीच आहे या बाबतचे सिद्धांतग्रंथातील आधार पढील प्रमाणे- ‘पातस्य मध्यमत्वात स्पष्टत्व अभावेन’ अर्थात, पात(राह) मध्यमच घ्यावा कारण स्पष्टराहचा (स्पष्टराहच्या गणिताचा) अभाव आहे. ‘पातो मीनांताद्विलोमं गच्छति पात(राहु) मीन राशिपासून मेष राशिपर्यंत उलटा(वक्री) फिरतो. ‘विलोमगतय: पाता:’ पात(राहची) गती ही विलोम म्हणजे वक्रीच आहे. 

उ) दृक गणितानुसार तयार करण्यात येणाऱ्या पंचांगांमध्ये, आकाशात फिरणाऱ्या व प्रत्यक्ष दिसणाऱ्या भौतिक ग्रहाचे स्थान दर्शविले जाते, परंतू सूर्यसिद्धांतात स्पष्ट सांगितले आहे की ‘अदृश्यरुपा: कालस्य मूर्तयो भगणाश्रिताः।’ वायवीय शरीरा अव्यक्तरुपत्वात् अदृश्यरुपा इति भावः। अर्थात ग्रहांची संज्ञा म्हणजे फक्त आकाशीय भौतिक पिंड नसून त्या अदृश्य अशा वायुरुपी ग्रहदेवता आहेत. वास्तविक पाहता पंचांगासाठी ग्रहांचे गणित करताना ग्रह हे ‘दृकतुल्य’ घ्यावेत असे सांगितले आहे. पण दृकसिद्धांतीय पंचांगात देण्यात येणारी ग्रहस्थिती ही त्या ग्रहदेवतांची स्थाने नसून भौतिक ग्रहपिंडांची स्थाने आहेत जी सिद्धांतज्योतिष व फलितासाठी उपयोगी नाहीत. धर्मशास्त्रानुसार, दृकसिद्धांतीय पंचांग गणिताचा वापर हा फक्त ग्रहणादि दृश्य घटनांच्या निर्णयासाठीच करावा व नित्य-नैमित्तिक व्रत-वैकल्ये श्राद्धकर्मे यासाठी सूर्यसिद्धांतानुसार येणाऱ्या
तिथींचाच अवलंब करावा असे अनेक आर्ष ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे. 

फ) सिद्धांतशिरोमणित भास्कराचार्य स्पष्टपणे सांगतात की यल्लङ्कोजयिनीपुरोपरि कुरुक्षेत्रादिदेशान् स्पृशत् । सूत्रं मेरुगतं बुधैर्निगदिता सा मध्यरेखा भुवः।।’ म्हणजे पृथ्विची मध्यरेखा ही दक्षिण ध्रुवापासून सुरु होऊन लंका (श्रीलंका नव्हे), उज्जयिनी, कुरुक्षेत्र या गावांना स्पर्श करुन मेरुपर्वतावरुन उत्तर ध्रुवापर्यंत जाते. या मध्यरेखेच्या आधारावरच भारतात प्राचीन काळापासून पंचागे तयार होत होती परंतू गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्रात उज्जैन मध्यरेखेवर आधारित पंचांग तयार करण्याची पद्धत पूर्णपणे बंद पडलेली आहे व त्या ऐवजी ग्रीनिच या पाश्चात्य देशातील शहरास आधार मानून महाराष्ट्रातील पंचांगांमध्ये दैनिक ग्रहस्थिती दिली जाते. प्राचीन काळापासून भारतातील उज्जैन इत्यादी शहरांस स्पर्श करणारी मध्यरेखा पंचांग गणितासाठी वापरात असताना पाश्चात्य शहरातील ग्रहस्थितीचे रुपांतर भारतीय प्रमाणवेळेत करुन पंचांग काढण्याचा द्राविडी प्राणायाम कशासाठी ??….. 

३. चित्रापक्षीय अयनांशाची निरर्थकता :
सर्व प्रथम चित्रापक्षीय अयनांश कसे आले ते पाहू, शके १८०० मध्ये श्री. व्यंकटेश केतकर यांनी पाश्चात्य गणितावर आधारित सायन मध्यम सूर्यामधून सूर्यसिद्धांताने आलेला मध्यम सूर्य वजा करुन आलेल्या अंश कला विकलांना चित्रापक्षीय अयनांश अशी संज्ञा दिली. केतकरांच्या मते चित्रापक्षीय अयनांशाची विषुववृत्तीय वार्षिक गती ५०विकला,२७प्रतिविकला आहे. या अयनांशाच्या गतीनुसार गणित करत मागे गेल्यास कलियुगारंभीचा दिवस मंगळवार येतो जो प्रत्यक्षात शुक्रवार आहे तसेच या अयनांशामुळे दर ८५ वर्षांनी सूर्यसंक्रांती काळात अंदाजे ५ तासाचे अंतर पडेल जे सांप्रत काळातही पडत आहे पर्यायाने अधिकमास व क्षयमास चुकतील. चित्रापक्षाच्या मते अयनांशाची गती ही चक्राकार म्हणजे ३६० अंश असते व हे चक्र पूर्ण होण्यास अंदाजे २६००० वर्षांचा कालावधी लागतो. पण सूर्यसिद्धांतात व वेदांमध्ये अयनांशाची गती ही आंदोलनात्मक (२७अंश पूर्वेकडे व २७अंश पश्चिमेकडे) सांगितली आहे, ज्याचा दाखला आपणास तैतिरीय ब्राह्मणात मिळतो- ‘अग्ने: कृत्तिका । शुक्रं परस्तात् ज्योतिरवस्तात् ।।’ या वचनातील अवस्तात् (मागे), परस्तात् (पुढे) या शब्दांवरुनच संपाताची गती आंदोलनात्मक असल्याचे सिद्ध होते. केतकरांच्या चित्रापक्षीय अयनांशाची गती चक्राकार मानली तर ५००० वर्षांपूर्वी कृष्णजन्माचेवेळी चैत्र महिना व वसंत ऋतु येतो, सर्वांना माहित आहेच की कृष्णजन्माचेवेळी श्रावणमास व वर्षा ऋतु होता. याउलट, संपाताची गती आंदोलनात्मक मानल्यास कृष्णजन्माचेवेळी श्रावणमास व वर्षाऋतूच येतो. त्याचप्रमाणे वेधाने अयनांशाच्या गतीचे परिक्षण करणे झाल्यास चित्रापक्षीय अयनांशासाठी २६००० वर्षे व सूर्यसिद्धांतीय अयनांशासाठी ७२०० वर्षे एवढा कालावधी लागतो, व तेवढे मानवाचे आयुष्य नाही. सबब ऋषीमुनींनी सांगितलेली अयनांशाची आंदोलनात्मक गतीच प्रमाण मानावी लागेल. तरी वरिल सर्व मुद्द्यांचा विचार करता दृक गणितावर आधारित पंचांग वापरणे किती योग्य आहे त्याचा सूज्ञ लोकांनी पुन्हा पुन्हा विचार करावा.

Leave A Comment